Sangli Samachar

The Janshakti News

"...तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा" - छगन भुजबळ

 

सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

मुंबई  - छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील "तू तू - मै मै" संपायला काही तयार नाही एकमेकावरील आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्यानंतर याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी चक्क मनोज जरांगे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसविण्यास सांगितले आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. वयोवृद्धांना व्याधी असू शकतात आणि त्यातून ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार? उपोषणामुळे कुणी दगावले, तर याची जबाबदारी मनोज जरांगेवर टाकावी. जरांगेंच्या उपोषणामुळे जर कुणी मृत्यूमुखी पडले, तर जरांगेवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. 

दरम्यान, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला आहे. एकमताने या कायदाला मान्यता देण्यात आली. पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचे शेपूट असून कधीच संपणार नाही. एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात. जरांगेंना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही. माझी मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो कधीही थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला चढलेली आहे. त्यामुळे त्याला सारखी प्रसिद्धी हवी असते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि खाली गादीवर तो बसलेला असतो, या शब्दांत छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला.