Sangli Samachar

The Janshakti News

कॉपी आढळल्यास केंद्र संचालकांवर कारवाई! दहावी-बारावी परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर, सात भरारी पथके तैनात

 

सांगली समाचार  - दि. १४|०२|२०२४

मुंबई  - राज्यात होणा-या दहावी व बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी होईल, त्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढविला जाणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दक्षता समितीला तसे निर्देश दिले आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात असतील. सोमवारी दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदी उपस्थित होते.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून होणार आहे. जिल्हाधिकारी सालीमठ अध्यक्षलेखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समितीच्या बैठकीत बोर्डाच्या परीक्षेबाबत नियोजन करण्यात आले.

२१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान बारावीचे पेपर होतील. हा २२ दिवसांचा कालावधी आहे. १ ते २६‌ मार्चदरम्यान बारा दिवस दहावीचे पेपर होतील. गणित आणि इंग्रजीच्या पेपरसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा केंद्रांवर बैठे पथक असेल. परीक्षा केंद्रांवर दक्षता पथक असेल. सर्व तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी त्या त्या केंद्रांना भेटी देतील. केंद्रस्तरावरही एक दक्षता पथक तयार करण्याचा आदेश आहेत. केंद्रांच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे.गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना


संवेदनशील परीक्षाकेंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण

जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात याव्यात.

उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष भेटीचे नियोजन.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी भेटीसंबंधी नियोजन.

तणावमुक्त वातावरणात परीक्षेसाठी प्रयत्न करावेत.

परीक्षार्थ्यांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्यांची झडती केंद्रावर पर्यवेक्षकामार्फत घ्यावी.

सर्व परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवा.