सांगली समाचार - दि. २५|०२|२०२४
सांगली - जिल्ह्यातील एकूण मध्यम व लघू अशा ८३ प्रकल्पांमध्ये अवघा २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २० तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. तर ११ तलावांनी मृत पाणीसाठा गाठला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २८ टक्के पाणीसाठा होता. वीस दिवसांत २ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ८३ प्रकल्प आहेत. त्यामध्ये ५ मध्यम प्रकल्प तर ७८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या या प्रकल्पात २६ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पात २६ टक्के तर मध्यम प्रकल्पांत १६ टक्के पाणीसाठा आहे. तासगाव, जत, कवठेमहांकाळ, तालुक्यात पाणीटंचाई गंभीर बनली आहे.
तासगाव आणि जत तालुक्यामध्ये १५ टक्के तर खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यात १८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याचवेळी या प्रकल्पांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा होता. तो आता २६ टक्क्यांवर आला असल्याने तब्बल ५० टक्के पाण्याची तूट आहे.
जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत सध्या २०५७ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी जत आणि आटपाडी तालुक्यांमधील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
गतवर्षी याच कालावधीत ८३ प्रकल्पांमध्ये ५८ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये तासगाव तालुक्यात ६९ टक्के, खानापूर ६४ टक्के, कडेगाव ५१ टक्के, शिराळा ५८ टक्के, आटपाडी ५९ टक्के, जत ५७ टक्के, कवठेमहांकाळ ६८ टक्के, मिरज ४५ टक्के आणि वाळवा तालुक्यात ३७ टक्के इतका पाणीसाठा होता. पाण्याअभावी जत तालुक्यातील सर्वाधिक १२ तलाव कोरडे पडले आहेत.
दुष्काळी गावांना टँकरचा आधार
जिल्ह्यात जत तालुक्यातील ४६ आणि आटपाडी तालुक्यातील ४ अशा एकूण ५० गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जत तालुक्याला ५० तर आटपाडीत ३ टँकर सुरू आहेत. जत तालुक्यात निगडी खु., शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी-पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, बेळोंडगी, मोकाशेवाडी-टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खु, कागनरी, दरीबडची, कोळगिरी, को. बोबलाद, लमाणतांडा, केरेवाडी तर, आटपाडीतील आंबेवाडी, पुजारवाडी, विठलापूर व उंबरगाव आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.