सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
नवी दिल्ली : २१० कोटी रुपयांचा आयकर परतावा मागत आयकर खात्याने काँग्रेस पक्षाची प्रमुख बँक खाती गोठवली होती. तथापि, नंतर आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने पुढील आठवड्यातील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ती वापरण्याची मुभा दिली. त्यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक होण्याच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी झाली होती. न्यायाधिकरणाने आमच्या खात्यांवर ११५ कोटी रुपयांचा धारणाधिकार (परतफेडीपर्यंत हमी म्हणून रक्कम ताब्यात ठेवणे) ठेवला असून, पक्षाला त्यावरील रक्कम खर्च करण्याची मुभा दिली आहे, असे काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पक्षप्रमुख राहुल गांधी यांच्यासह पक्षांच्या अनेक नेत्यांनी याबाबत संताप व्यक्त करत सरकारचे हे पाऊल लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
n२०१८-१९ या निवडणूक वर्षातील २१० कोटी रुपयांच्या आयकर परताव्यासाठी पक्षाची खाती गोठविण्यात आली असून, त्यात भारतीय युवक काँग्रेसच्या खात्याचाही समावेश आहे.
पक्षाने संबंधित वर्षाचे आयकर विवरणपत्र काही दिवस उशिरा भरले व त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हे प्रकरण पक्षाचे आमदार व खासदारांनी त्यांच्या वेतनातून देणगी म्हणून दिलेल्या १४.४ लाख रुपयांच्या रोख पावत्यांशी संबंधित आहे.
माकन म्हणाले, न्यायाधिकरणाने आम्हाला बँकांत ११५ कोटी रुपये हमी म्हणून ठेवावे लागतील, असे सांगितले. यामुळे आम्ही कार्यालयांचे वीज बिल भरू शकत नाही आणि कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही नाही.
केंद्र सरकारने घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस हे धनशक्तीचे नाही तर जनशक्तीचे नाव आहे... आम्ही हुकूमशाहीपुढे कधी झुकलो नाही आणि झुकणारही नाही. भारताच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आपादमस्तक लढेल," असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.