सांगली समाचार दि. १५|०२|२०२४
सांगली : शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यात आला असून याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. या मागणीसाठी स्वाभिमानीने सातत्याने मागणी केली होती. शेतकर्यांचा मालाला चांगला दर मिळावा, तसेच मुलांना अधिक पौष्टिक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा असा आग्रह संघटनेने सातत्याने धरला होता. याबाबत शासन अद्यादेश काढण्यात आला असून हे आमच्या लढ्याचे यश असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला. आता बेदाणा खरेदी व्यापार्याकडून न करता थेट शेतकर्यांकडून करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या निर्णयाबद्दल आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांना पेढे भरवण्यात आले. या निर्णयाबाबत खराडे यांनी सांगितले, जिल्ह्यात सुमारे २ लाख ७५ हजार तर राज्यात सुमारे सव्वा कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकवेळ पोषण आहारात ५० ते १०० ग्रॅम बेदाणा मिळणार आहे. यासाठी दर आठवड्याला पाच लाख टन बेदाण्याची गरज भासणार असून याचाच फायदा बेदाणा उत्पादक शेतकर्याना होणार आहे.
यावेळी संजय बेले, संजय खोलखुंबे, अजित हळिंगळे, प्रकाश मिरजकर श्रीधर उदगावे, बाळासाहेब भानुसे, महेश संकपाळ, शातीनाथ लिंबेकाई, सचिन वसगडे, ऋषिकेश कनवाडे, दीपक कनवाडे, महावीर चौगुले, दीपक मगदूम, सागर बिरनाळे, सुरेश पाचिबरे आदी उपस्थित होते.