Sangli Samachar

The Janshakti News

अ‍ॅक्सिस बँकेची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक

 


सांगली समाचार  - १७|०२|२०२४

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथील ॲक्सिस बँकेच्या  शाखेत तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट डिमांड ड्राफ्ट भरून त्याचे पैसे काढून घेणारा संशयित आरोपी एसके. ट्रेडिंगचे संचालक अनिकेत श्रीनिवास मुदंडा (रा. चिंचखेड रोड, महेशनगर, बालाजी मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत) याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी आणखी तीन संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. याबाबत ॲक्सिस बँकेचे पिंपळगाव बसवंत शाखेचे व्यवस्थापक नितीन राजेंदरनाथ बाली (४६, रा. क्लासिक अपार्टमेंट, बापू बंगल्याजवळ, नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

बोगस डिमांड ड्राफ्टद्वारे फसवणूक

या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित अनिकेत मुदंडा याने पिंपळगावच्या अॅक्सिस बँकेत ३ कोटी ५० लाख रुपये किमतीचा बोगस डिमांड ड्राफ्ट दि. ३० जानेवारी २०२४ रोजी भरला व त्याचे रोखीकरण करून घेतले. त्यामुळे बँकेची साडेतीन कोटींची फसवणूक झाली आहे.


बेंगळुरूच्या बँकेतही पाठवला सारखाच डिमांड ड्राफ्ट

दरम्यान, अशाच प्रकारचा डिमांड ड्राफ्ट बँकेच्या बेंगळुरू येथील साथीदाराने बेंगळुरूच्या बँकेत पाठविला. त्यावेळी बेंगळुरूच्या शाखेत लक्षात आले की, दोन्ही डिमांड ड्राफ्ट एकाच रकमेचे व सारख्याच नंबरचे आहेत. त्यावरून आरोपीने हेतूपूर्वक बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक नितीन बाली यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस  ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश एम. तिवारी हे करीत आहेत.