Sangli Samachar

The Janshakti News

तिस-या जागतिक महासत्तेच्या दिशेने भारताची आगेकूच

सांगली समाचार, - दि. २२|०२|२०२४

नवी दिल्ली : एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) सातत्यपूर्ण वाढ, अनुकूल भू-राजकीय धोरण, वाढते बाजार भांडवल, पायाभूत सुधारणा आणि उत्तम व्यावसायिक संस्कृती यामुळे भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल, असे जागतिक ब्रोकरेज संस्था 'जेफरीज'ने म्हटले आहे. ''गेल्या दहा वर्षांमध्ये, भारताचा 'जीडीपी' सात टक्के दराने वाढून ३.६ लाख कोटी डॉलर झाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने आठव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर उडी मारली आहे. पुढील चार वर्षांमध्ये, भारताचा 'जीडीपी' पाच लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल आणि जपान व जर्मनीला मागे टाकून ती तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, लोकसंख्येमुळे होणारा सातत्यपूर्ण श्रम पुरवठा, प्रशासकीय पातळीवरील सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे,'' असे 'जेफरीज'मधील तज्ज्ञ महेश नांदूरकर यांनी म्हटले आहे.

भारताचा गेल्या दहा आणि वीस वर्षांमध्ये १० ते १२ टक्के वाढीचा सातत्यपूर्ण इतिहास आहे. भारतीय शेअर बाजाराचे मूल्य ४.५ लाख कोटी डॉलर असून, ते सध्या जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. परंतु जागतिक निर्देशांकांमध्ये भारताचे वजन अजूनही १.६ टक्के (दहाव्या क्रमांकावर) कमी आहे. २०३० पर्यंत भारत जवळपास दहा लाख कोटी डॉलरची बाजारपेठ बनेल, याकडे मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांना दुर्लक्ष करणे अशक्य आहे,'' असेही नांदूरकर म्हणाले. ''भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी इक्विटी बाजारपेठ आहे आणि २०३० पर्यंत बाजारमूल्य दहा लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल,'' असे 'जेफरीज'च्या अहवालात म्हटले आहे.