सांगली समाचार - दि. २०|०२|२०२४
इस्लामपूर - राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. महायुतीचे अनेक नेते जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात येत आहेत. दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरात पक्ष कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर आता 25 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री 25 फेब्रुवारीला इस्लाम्पू
र शहरात येणार असल्याने त्याबाबतची तयारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा शहरातील खुले नाट्यगृह या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकार राबवत आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 'शासन आपल्या दारी'ची चर्चा होती. जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनाच या कार्यक्रमासाठी आणण्याचा चंग शिंदे गटाने बांधला होता. याशिवाय शासकीय कार्यक्रम कुठे घ्यायचा याबाबत एकमत होत नव्हते, परंतु शिंदे सेना आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने कार्यक्रम फायनल झाला आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांचा सन्मान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यशिवाय इस्लामपुरात विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री शिंदे यांनी उरण इस्लामपूर नगरपालिकेच्या इमारतीसाठी 22 कोटी रुपये मंजूर केले आहेत. भाजी मंडई इमारतीसाठी 52 कोटी तसेच नगरपरिषदेच्या विविध योजनांवर सुमारे 20 कोटी रुपये निधी दिला आहे. त्या कामांचा शुभारंभ शिंदे करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा इस्लामपूर हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बालेकिल्ला घेरला आहे. दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. तेथे त्यांनी पक्षाचे कार्यालय सुरू केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची चर्चा होती, परंतु तत्पूर्वीच सत्ताधारी महायुतीमधील शिंदे गटाने बाजी मारली.
मुख्यमंत्री शिंदे यांचा 25 फेब्रुवारीला दौरा फायनल केला आहे. इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम होणार असल्याने ते काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. गेल्या महिनाभरापासून महायुतीचे मातब्बर नेते सातत्याने इस्लामपुरात येत असल्याने जयंतरावांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र दिसते.