Sangli Samachar

The Janshakti News

कतार प्रकरण मार्गी लावण्यात 'या' व्यक्तीचा आहे सिंहाचा वाटा; मुत्सद्देगिरीचा केला पुरेपूर वापरसांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. दरम्यान, मायदेशी परतलेल्या नौसैनिकांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मात्र या सर्व प्रकरणात पंतप्रधानांशिवाय आणखी एका व्यक्तीची कामगिरी उल्लेखनीय आहे, ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पडद्याआडून आपली कामगिरी पार पाडत होते. त्यांच्याच मुत्सद्देगिरीमुळे हे आठ माजी भारतीय नौदलाचे कर्मचारी सुरक्षितरित्या मायदेशी परतले.
डोवाल यांनी स्वतः अनेक बैठका घेतल्या !

प्राप्त माहितीनुसार, या आठ भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय आणि कतारच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. अजित डोवाल यांनी स्वतः कतारच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या 8 माजी नौसैनिकांची तुरुंगवासाची शिक्षा संपुष्टात आणण्यासाठी सातत्याने आग्रह धरला. अजित डोवाल यांच्या प्रयत्नानंतरच कतार सरकारने त्यांची सुटका केल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर कतारने 8 भारतीय तसेच एका अमेरिकन आणि एका रशियन लोकांना आपल्या ताब्यातून सोडले आहे.

भारताशिवाय रशिया,अमेरिकेच्या कैद्यांचीही सुटका !

भारताने या प्रकरणात कमालीचा मुत्सद्दीपणा दाखवला आहे. भारताने यासंदर्भात सातत्याने बैठका घेतल्या. त्यामुळे कतारला असा प्रश्न पडला असेल की तो फक्त एकाच देशाच्या नागरिकांना कसे सोडणार आणि इतर देशांच्या अशा विनंतीकडे दुर्लक्ष कसे करणार. अशा परिस्थितीत भारताच्या प्रयत्नांमुळे कतारने अमेरिका आणि रशियाच्या प्रत्येकी एका कैद्याची सुटका केली.