सांगली समाचार - दि. १७|०२|२०२४
लोणंद - आमचा पक्ष नेला, चिन्हही नेले. पण त्याची चिंता करत नाही. कुणी कुठं गेलं तरी आपला विचार सोडायचा नाही. काही काळजी करायची नाही, आपल्यात धमक आहे. आपली वैचारिक भूमिका मजबूत आहे. त्यामुळे कोणीही काही करू शकत नाही. मी निर्णय घेतलाय, महाराष्ट्रातील कानाकोपर्यात जाऊन नव्या पिढीला ताकत देणार आहे. महाराष्ट्राचा चेहरा ही नवी पिढी बदलू शकते हा इतिहास निर्माण करणार आहे, असा विश्वास खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
डॉ. नितीन सावंत युवा मंचच्यावतीने लोणंद येथे आयोजित शरद कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, निमंत्रक डॉ. नितीन सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खा. शरद पवार म्हणाले, काही जण बाजूला गेले. मात्र, सत्ता कायमची नाही तर विचार कायम आहे. अनेक लोक सांगतात वय झालं, वय झालं पण त्यांनी अजून काय बघितलं आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. आमच्या वयाची चिंता करू नका. वयाच्या ८५ व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते.