Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? राहुल नार्वेकर यांची भेट घेतली अन् अशोक चव्हाण नॉट रिचेबल




सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

मुंबई  - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कॉंग्रेसला दोन मोठे दणके बसले आहेत.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. तर, यापूर्वी मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसला जबरदस्त दणका बसला असून निवडणुकीच्या तोंडावर मोठी खळबळ उडाली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे.

अशोक चव्हाण यांच्या पत्रात काय?

मी दिनांक १२ फेबुवारी २०२४ मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिवाय त्यांनी माजी विधानसभा सदस्य असा स्वतःचा उल्लेख केला आहे.


अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाची साथ सोडत असल्याचे पत्र त्यांनी लिहिले आहे. त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडत आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण हे काही काळ नॉट रिचेबल होते. शिवाय भाजपाच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु असल्यामुळे ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले हे तातडीने दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हाय कमांडसोबत ते बैठक करणार असल्याचे बोलले जात आहे.