Sangli Samachar

The Janshakti News

बारा बलुतेदारांसाठी आर्थिक मागास विकास महामंडळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

सांगली समाचार  - दि. १६|०२|२०२४

अकोला - राज्यातील बारा बलुतेदारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यासोबतच त्यांच्या विकासासाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील बारा बलुतेदार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ही बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने व माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. 

याबैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेवून समाजाच्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. 

माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी बारा बलुतेदारांमध्ये येणाऱ्या समाजघटकांना येणाऱ्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बारा बलुतेदारांच्या शिष्ठमंडळा दिलेल्या आश्वासनानुसार, प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाणार आहे.

याशिवाय बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तेर- ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

या बैठकीला आमदार बळीराम सिरस्कार, बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुजर, प्रदेश सचिव चंद्रकांत गवळी, लक्षमणराव वडले, अनिल शिंदे, सोमनाथ शेळके, धनंजय शिंगाडे, सतिशदादा दरेकर हरदास शिंदे, चंद्रबळी चौधरी (मुंबई) आदींची उपस्थिती होती.