Sangli Samachar

The Janshakti News

गुजरात बनलंय ड्रग्जचं आगार; पुन्हा एकदा हजारो कोटी किंमतीचं 3,300 किलो ड्रग्ज जप्त

 

सांगली  समाचार  - दि. २८|०२|२०२४

अहमदाबाद - गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचं आगार झाल्याची परिस्थिती आहे. कारण इथं पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं पकडला आहे. ३,३०० किलो वजनाचं हजारो कोटींचं हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे. 

इराणी आणि पाकिस्तानी क्रू मेंम्बर्सना अटक

एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या पोरबंदर इथं एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये एका जहाजातून गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात येत असलेलं 3300 किलो पेक्षा जास्त ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 5 क्रूना अटक करण्यात आली आहे. जे इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे.

३,३०० किलोहून अधिक ड्रग्जचा साठा

या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये 3,089 किलो चरस, 158 किलो मेथॅम्फेटामाइन 25 किलो मॉर्फिनचा समावेश आहे. सुमारे 3,300 किलोहून अधिक वजनाचा हा ड्रग्जचा साठा समुद्रमार्गे घेऊन जाणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडला. 

विमानानं दिले होते इनपूट

विमानाच्या इनपुटच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलानं तस्करीत गुंतलेल्या संशयास्पद जहाजाला थांबवलं. एटीएस, NCB आणि नौदलाची ही सर्वात मोठी संयुक्त कारवाई ठरली आहे. पकडलेल्या बोटी आणि चालक दलासह जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज हे भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.